नवी दिल्ली, दि. 18 - ट्रिपल तलाकवरून देशातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वैचारिक घुसळण सुरू आहे. ट्रिपल तलाकचा गैरफायदा घेतला जात आहे का याची चर्चा सुरू आहे. एकंदरीत ट्रिपल तलाकचा मुद्दा गरम असतानाच उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील गोंडा येथील न्यायालयात एक पती आपल्या पत्नीला तलाक तलाक तलाक म्हणून फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पत्नीला जबर धक्का बसला असून, पतीच्या कृत्यानंतर ती बेशुद्ध झाली आहे.
फैजाबाद येथील गोंडामधील एका दिवाणी न्यायालयात असलेल्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीसंबंधी दाव्यावर सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. पत्नीला ट्रिपल तलाक दिल्यानंतर त्या पतीने तेथून पळ काढला. अनपेक्षित घटनेमुळे धक्का बसल्याने पत्नी तेथेच बेशुद्ध पडली. तर आपली आई बेशुद्ध पडल्याचे पाहून तिच्या लहान मुलीला रडू कोसळले.
रुकैया खातून असे तलाक देण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, 2014 साली तिचा निकाह महफूझ अहमद याच्याशी झाला होता. निकाहानंतर महफूझ याने रुकैया हिच्याकडे विविध वस्तूंची मागणी केली. मात्र मागणीची पूर्तता होत नसल्याने त्याने रुकैया हिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने पतीसह सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार नोंदवली. तसेच पोटगीची मागणी केली. मात्र आज न्यायालयात सुनावणी असतानाच महफूझने रुकैया हिला तलाक दिला.
दरम्यान, या घटनेनंतर मौलाना खालिद रशीद फरंगी यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत महफुझला वाळीत टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. महफूझ याच्या घराजवळील मशिदीतून याची घोषणा होईल, असेही ते म्हणाले.