लखनौ : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांचे कर्ज माफ करण्याचा विचार उत्तर प्रदेश सरकार करीत आहे. सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाला थकीत ३.८८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करायचे आहे. सहा हजार ८२१ दिव्यांगांकडे ३.८८ कोटींचे कर्ज थकलेले आहे. येत्या १०० दिवसांत या विभागाचा हे कर्ज माफ करण्याचा प्रयत्न असेल. दिव्यांगजन सशक्तीकरण खात्याचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात जवळपास दोन कोटी दिव्यांगजन आहेत. दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवायची उत्तर प्रदेश सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न आहे. दिव्यांगजनांनीही स्वत:चा कुटिरोद्योग सुरू करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हळुहळू त्यांनी एमएसएमईमध्येही (मायक्रो, स्मॉल, मिडियम एंटरप्रायजेस) जावे, असे राजभर म्हणाले. दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल देण्याचा प्रस्ताव आहे. या सायकलला ट्रॉली जोडलेली असेल व त्यात तो भाजीपाला वा इतर वस्तू फिरून विकू शकेल. महिला दिव्यांगांना शिलाई यंत्रे उपलब्ध करून दिली जातील. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशात दिव्यांगांचे कर्ज माफ होणार
By admin | Published: June 15, 2017 1:07 AM