नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशवासीयांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व जण सुखी, समृद्धी आणि निरोगी राहो' असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. "दिवाळी हा स्वच्छतेचा सण आहे म्हणून आपण प्रदूषणमुक्त, पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ दिवाळी साजरी करून निसर्गाचा सन्मान करूया" असं म्हणत रामनाथ कोविंद यांनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करण्यासाठी एक दीप प्रज्वलित करा, असं भावनिक आवाहन मोदींनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केलं आहे. जवानांच्या धैर्याबद्दल आपल्या मनातील कृतज्ञतेच्या जाणिवेला शब्द न्याय देऊ शकत नाहीत, जे जवान सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांचेही आपण ऋणी आहोत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. याआधी मोदींनी ‘मन की बात’मधूनही दिवाळीला जवानांसाठी एक दीप प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जसलमेरला जाण्याची शक्यता आहे.
"स्वच्छ दिवाळी साजरी करून निसर्गाचा सन्मान करूया"
"दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना आणि परदेशात स्थायिक झालेल्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आनंद आणि प्रकाशाच्या या महापर्वामुळे देशातील प्रत्येक घरात आनंद, शांती आणि समृद्धी येईल.हा सण आपल्याला मानवतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतो. चला आपण संकल्प करूया की, एक दिवा अनेक दिवे प्रज्वलित करतो त्याच प्रकारे समाजातील गरीब, निराधार आणि गरजू लोकांच्या जीवनात आनंद आणून आशा आणि समृध्दीचा दिवा प्रज्वलित करू" असं ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
"दिवाळी हा स्वच्छतेचा देखील सण आहे, म्हणून आपण प्रदूषणमुक्त, पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ दिवाळी साजरी करून निसर्गाचा सन्मान करूया" असं देखील राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. नेतेमंडळींसह लोकप्रिय सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.