Central Government Jobs: दिवाळीच्या आधी, म्हणजेच 22 ऑक्टोबर 2022 रोजी(धनत्रयोदशीच्या दिवशी) पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाख लोकांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावा सुरू करणार आहेत. या रोजगार मेळाव्यांतर्गत पहिल्या टप्प्यात 75000 लोकांची भरती केली जाणार आहे. या 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील.
नियुक्त केलेले 75,000 लोक सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये सामील होतील. हे नियुक्त केलेले लोक गट अ, गट ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क या स्तरावर सामील होतील. ज्या पदांवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस या पदांचा समावेश आहे.
या पदांसाठी नियुक्त्या मंत्रालये/विभागांद्वारे मिशन मोडमध्ये तसेच UPSC, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भर्ती मंडळासारख्या इतर भर्ती एजन्सींद्वारे केल्या गेल्या आहेत. या लोकांची त्वरीत नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी निवड प्रक्रिया सुलभ आणि तंत्रज्ञानासह एकत्रित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्व मंत्रालये आणि विभाग मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्याचे काम करत आहेत.
14 जून 2022 रोजी पीएम मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली होती की पुढील दीड वर्षात म्हणजेच 2023 च्या अखेरीस केंद्र सरकार आपल्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख लोकांची भरती करणार आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.