दिवाळीसाठी घराची साफसफाई केली जाते. मात्र याच दरम्यान राजस्थानमधील भिलवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली. भीलवाडा शहरात एका कुटुंबाने साफसफाई करताना चुकून तब्बल साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने कचऱ्याच्या ट्रकमध्ये फेकले. आपली चूक लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आणि त्यांनी तातडीने महापौर राकेश पाठक यांना माहिती दिली.
महापौर राकेश पाठक यांनी विशेष टीम तयार केली, ज्यांनी अथक परिश्रमानंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून हरवलेलं सोनं परत मिळवलं. हरवलेले सोन्याचे दागिने सापडल्यावर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. चिराग शर्मा यांनी सांगितलं की, दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी त्यांनी सोनं एका खास ठिकाणी ठेवलं होतं. मात्र कचऱ्याचा ट्रक येताच कचऱ्यासह चुकून सोनं फेकलं गेलं.
चूक लक्षात येताच त्यांनी महापौर राकेश पाठक यांना माहिती दिली. महापौर राकेश पाठक यांनी सांगितलं की, वॉर्ड नंबर २७ मधील एका कुटुंबाकडून सुमारे साडेचार लाखांचं सोनं कचऱ्याच्या ट्रकमध्ये फेकल्याची माहिती मिळाली होती. सोन्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आणि अथक प्रयत्नांनंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ते काढण्यात त्यांना यश आलं. वॉर्ड सुपरवायजर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवला.
वॉर्ड नंबर २७ चे सुपरवायजर हेमंत कुमार म्हणाले की, महापौरांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी कचरा ट्रकच्या चालकाशी संपर्क साधला. कचरा कुठे टाकण्यात आला याबाबतची माहिती घेतली. तेथे गेल्यानंतर त्यांना सोनं एका मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं आणि त्यांनी ते कुटुंबाला परत केलं. कुटुंबाला खूप आनंद झाला.