लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दीपोत्सवाच्या उत्साहाने गर्दीने भरलेल्या बाजारपेठा आणि त्यामुळे झालेली मोठी आर्थिक उलाढाल यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे निश्चित झाले असतानाच आता विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. निम्मा नोव्हेंबर संपला तोपर्यंत देशभरातून ५० हजार १५९ अब्ज युनिट (बीयू) एवढी वीज पुरवली गेली. गेल्या वर्षापेक्षा यंदा ८ टक्क्यांनी विजेची मागणी वाढल्याची नोंद झाली आहे. विजेच्या वापरात वाढ होण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत देशभरात ५० हजार अब्ज युनिटहून अधिक प्रमाणात वीज पुरविण्यात आली. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७.८ टक्क्यांनी कमी होते. कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि देशभरात लागू झालेली टाळेबंदी यांमुळे विजेच्या वापरात कमालीची घट झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून विजेच्या मागणीत वाढ नोंदवली गेली. सप्टेंबरमध्ये ११२.४ बीयू वीज वापरली गेली. तर ऑक्टोबरमध्ये हेच प्रमाण ११२ बीयू होते. नोव्हेंबरमध्ये तर पहिल्या १५ दिवसांतच १५० बीयूहून अधिक प्रमाणात विजेचा वापर झाला. टाळेबंदी शिथील केल्यानंतर सुरू झालेले उद्योग-व्यवसाय, उत्पादन क्षेत्रात सुरू झालेल्या हालचाली इत्यादींमुळे विजेचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.