नवी दिल्ली : दसरा-दिवाळीसाठी ३०.६७ लाख अराजपत्रित केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्पादकता व अॅडहॉक अशा दोन प्रकारे केंद्र सरकारने बोनस देण्याचे ठरविले असून त्यासाठी ३,७३७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कर्मचाºयांना बोनसची रक्कम एकाच हप्त्यात दसºयापूर्वी मिळणार आहे.
कोरोनाचे सावट असलेल्या सणासुदीच्या दिवसांत मध्यमवर्गीयांच्या हातात खर्चाला पैसा असावा व त्यानिमित्ताने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळावी असाही या निर्णयामागे केंद्र सरकारचा हेतू आहे. २०१९-२० या वर्षासाठी हा बोनस देण्याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ३० लाखांहून अधिक अराजपत्रित केंद्रीय कर्मचाºयांना हा बोनस मिळेल. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. खरेदीचे प्रमाण वाढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन योजना जाहीर केल्या होत्या. त्याच्याशी सुसंगत असा बोनसचा निर्णय केंद्राने घेतला.
पीएलबी बोनससाठी होणार २७९१ कोटी खर्च -जावडेकर म्हणाले, केंद्रीय कर्मचारी करत असलेल्या कामाच्या उत्पादकेशी निगडित (पीएलबी) बोनसचा लाभ १६.९७ लाख अराजपत्रित कर्मचाºयांना मिळणार असून त्यामध्ये रेल्वे, संरक्षण, पोस्ट, ईपीएफओ, ईएसआयसी आदी खात्यांतील कर्मचाºयांचाही समावेश आहे. यावर २,७९१ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
अॅडहॉकसाठी ९४६ कोटी -तदर्थ अनुदान तत्त्वावर (अॅडहॉक) देण्यात येणाºया बोनसचा फायदा १३.७० लाख अराजपत्रित कर्मचाºयांना होणार असून, त्यासाठी ९४६ कोटी खर्च होईल.