काठमांडू - गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली, संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार, देशभरात उत्साह दिसून येत आहे. तर, भारताच्या शेजारील नेपाळमध्येही दिवाळीसारखाच उत्साह पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशभरात या उत्सवाचा आनंद आणि उत्साह दिसून येत आहे. तर, शेजारील देश असलेल्या नेपाळमध्येही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव दिसून येत आहे. नेपाळमधील सिद्धार्थनगर आणि महाराजगंज जिल्ह्याजवळील नेपाळ सीमारेषेवर असलेल्या कृष्णानगर, मरजादपुर, चाकरचौडा, उडवलिया, बहादुरगंज, महाराजगंज, लुंबिनी, भैरहवा, नवलपरासी सह इतरही सीमाभागात प्रभू श्रीरामांचा जयघोष पाहायला मिळत आहे.
येथील घरांवर प्रभू श्रीरामाच्या झेंड्यांनी व स्टीकरने घर व परिसर सजवण्यात आला आहे. गल्लोगल्ली भगव्या पताक्यांनी परिसर सजला आहे. येथील अनेक भागात एलईडी स्क्रीनवरुन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. अनेक मंदिरात किर्तन, रामकथा आणि रामायण पुराणांचे वाचन होत आहे. नेपाळचे जनकपूर नगर हे प्रभू श्रीरामांची सासरवाडी आहे. म्हणूनच, नेपाळचे लोक अयोध्येला आपल्या मुलाचं घर मानतात. त्यामुळेच, येथील लोकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे.
कृष्णानगर नगरपालिकेचे महापौर रजतप्रताप शाह यांनी म्हटले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने ४० गावांत शोभायात्रा काढण्यात आली. कृष्णानगरमध्ये ४ तोरणद्वार उभारण्यात आले आहेत.
नेपाळमधील घराघरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून घरोघरी दीपोत्सवत असल्याचं स्थानिक विजय थापा यांनी सांगितले. हिंदू परिषद नेपाळचे राष्ट्रीय प्रवक्ता ओंकार हिंदू यांनी म्हटले की, लुंबिनी येथून २०० पेक्षा अधिक लोक चालत अयोध्येला गेले आहेत.