लखीमपूर खेरी/मिर्झापूर/श्रावस्ती : उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेले कामगार तब्बल १७ दिवसांनी मंगळवारी रात्री बोगद्यातून सुरक्षित बाहेर पडल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, गावांमध्ये बुधवारीही एकमेकांना मिठाई खाऊ घालून दिवाळीसारखा आनंद साजरा करण्यात आला.उत्तर प्रदेशातील आठ मजूर बोगद्यात अडकले होते. राम मिलन यांचा मुलगा संदीप कुमार यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री बोगद्यातून कामगार बाहेर पडल्याची पहिली बातमी मिळताच लोक ‘सर्व चांगले झाले’ असे म्हणत घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती, लोकांनी दिवे लावून आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालून ‘दिवाळी’ साजरी केली.
थरारक अनुभव...बोगदा ज्या ठिकाणी कोसळला तिथून मी केवळ १५ मीटर अंतरावर काम करत होतो. सुरुवातीला मला ते एक स्वप्न वाटले; पण मला लवकरच समजले की हे स्वप्न नसून एक भयानक वास्तव आहे. आम्ही सगळे घाबरलो होतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. तहान, अन्न न मिळणे, गुदमरणे या सर्वांचा एकत्रित विचार मनात आला; पण बाहेरून चार इंची ड्रेन पाइपद्वारे संपर्क झाल्यावर दिलासा मिळू लागला, असे मनजीत चौहान या अडकलेल्या कामगाराने सांगितले.
त्यांना पाहिले आणि... जेव्हा आम्ही ढिगाऱ्याच्या शेवटच्या भागात पोहोचलो तेव्हा त्यांना (कामगार) आमचे ऐकू आले. ढिगारा साफ केल्यानंतर लगेचच आम्ही दुसऱ्या बाजूला खाली उतरलो. यावेळी अडकलेल्या कामगारांनी माझे आभार मानले आणि मला मिठी मारली. त्यांनी खांद्यावर उचलून घेतले. कामगारांना बाहेर काढल्याने मला अधिक आनंद होत आहे, असे ४१ कामगारांना भेटणारे पहिले व्यक्ती फिरोज कुरेशी यांनी सांगितले.
आजही थरथर कापतो लखीमपूर खेरी जिल्ह्यात राहणारा मनजीत चौहान (२५) हादेखील बोगद्यात अडकला होता. ढिगाऱ्यांमुळे बोगदा बंद झाल्याची भीषण घटना आठवून तो आजही थरथर कापतो. मात्र, बोगद्यातून सुखरूप बाहेर आल्यानंतर त्याच्या गावात जल्लोषाचे वातावरण आहे.
खडकातून टपकणारे पाणी प्यायलो...रांची : बोगद्याचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर सुरुवातीला खडकांतून टपकणारे पाणी प्यायलो, मुरमुरे खाल्ले. मोठा ढिगारा कोसळल्यानंतर आम्हाला वाटले की, आम्ही यात गाडले जाऊ. सुरुवातीला आम्ही आशा सोडली होती. हे एका भयानक स्वप्नासारखे होते. असा अनुभव ४१ कामगारांपैकी एक अनिल बेदिया यांनी सांगितला.
नागपूरच्या पथकाने घेतली महत्त्वाची काळजीनागपूर - अडकलेल्या ४१ कामगारांचा कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढून श्वास गुदमरू नये याची काळजी नागपूरस्थित वेस्टर्न कोल फिल्डस्च्या पथकाने घेतली. कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोल फिल्डस्मधील (डब्ल्यूसीएल) तीन तज्ज्ञांनी २० नोव्हेंबरपासून सिल्कियारा बोगद्याच्या ठिकाणी तळ ठोकला होता. ते चर्चा आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गुंतलेल्या सुकाणू समितीचा भाग होते, असे समितीचे सदस्य आणि कंपनीचे महाव्यवस्थापक (आपत्कालीन सेवा) दिनेश बिसेन म्हणाले. समितीत उपव्यवस्थापक (आपत्कालीन सेवा) एम. विष्णू आणि सीएमपीडीआयचे संचालक ए. के. राणा यांचाही समावेश होता.
थरारक सुटकेवर जग काय म्हणते? - लंडन : बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे अविश्वसनीय आणि जोखमीचे यशस्वी ऑपरेशन पूर्ण झाल्याबद्दल जागतिक माध्यमांनी कौतुक केले आहे. मानवी श्रम मशिन्सवर भारी पडले, असे माध्यमांनी म्हटले आहे.- ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने लिहिले की, शेवटी हा मानवी कामाचा यंत्रांवर झालेला विजय होता, कारण ‘रॅट होल मायनिंग’ तज्ज्ञांनी यंत्रे हतबल ठरल्यानंतर हाताने खोदून ढिगारा मोकळा केला. अनेक अडथळ्यांवर मात करून मोठ्या बचाव मोहिमेत त्यांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. - लंडनमधील ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले की, हे मिशन पूर्ण करण्यासाठी लष्करी अभियंते आणि खाण कामगारांनी ढिगाऱ्यात ‘रॅट होल ड्रिल’ केले. फ्रान्स २४नुसार रॅट होल खाण तज्ज्ञांनी हाताने खोदकाम करून ऑपरेशन यशस्वी करण्यात मदत केली.