बांका : ‘येथे जमलेला विशाल जनसागर पाहून मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की येणाऱ्या दिवसांत बिहारमध्ये लोक दोनदा दिवाळी साजरी करतील. पहिल्यांदा निवडणूक निकालानंतर आनंदोत्सव साजरा केला जाईल आणि त्यानंतर दिवाळीत,’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बांका येथे एका प्रचार सभेत केले.निवडणुका जाहीर झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्या प्रचार सभेत बोलताना मोदींनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘खूप मग्रूर’ संबोधून त्यांच्यावर टीका केली. बिहारचे भविष्य बदलण्यासाठी लोकांनी भाजपाच्या विकास अजेंड्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोदींनी रोजगारासाठी स्थलांतर करण्याच्या मुद्याला हात घालून युवक आणि गरिबांची मने जिंकण्याचाही प्रयत्न केला. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर विकासात आहे, असे त्यांनी सांगितले.बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजवर संशय घेतल्याबद्दल मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. कोसी येथील पूरग्रस्तांसाठी गुजरातने दिलेले पाच कोटी रुपये नितीशकुमार यांनी परत केले होते, याचे स्मरणही मोदींनी यावेळी करून दिले. (वृत्तसंस्था)
‘बिहारमध्ये यंदा दोनदा दिवाळी साजरी होणार’
By admin | Published: October 02, 2015 11:47 PM