नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान रामलल्ला यांच्या वकीलांना विचारण्यात आले की, प्रभू श्री रामाचे कोणी वंशज अयोध्या अथवा जगातील कोणत्या कोपऱ्यात आहेत का? यावर वकीलांना आम्हाला त्याची माहिती नाही मात्र ती माहिती घेऊ असं सांगितले. मात्र या प्रकरणावर आता जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपाच्या खासदार दिया कुमारी यांनी मोठं विधान केलेलं आहे. प्रभू श्रीरामाचे वंशज जगभरात पसरले आहेत इतकचं नाही तर आम्हीही प्रभू राम यांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत असा दावा केला आहे.
भाजपा खासदार दिया कुमारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेची बोलताना असा दावा केला आहे की, जयपूरमधील राजघराणे प्रभू श्रीरामाचे वंशज आहे. याबाबतची हस्तलिखीत, वंशावळी आणि दस्तावेज आमच्याकडे उपलब्ध आहेत. जयपूरचे राजा आणि माझे पती हे भवानी सिंह कुश यांची 309 पिढी आहे.
दिया कुमारी यांनी कुश यांचे वंशज असणारं दस्तावेज सादर केले. त्यात प्रभू श्रीरामाच्या वंशजाची नावं लिहिली होती. या कागदपत्रात 289 व्या वंशजाच्या यादीत सवाई जयसिंह आणि 307 वी पिढी महाराजा भवानी सिंह यांचे नाव आहे.
दरम्यान रामजन्मभूमी वादाबाबतच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात आठवड्यातले पाच दिवस सुनावणी होत असून, त्याबद्दल एका मुस्लिम पक्षकाराने शुक्रवारी आक्षेप नोंदविला. इतक्या घाईने हा खटला चालविला जाणार असल्यास सहकार्य करणे शक्य होणार नाही असे या पक्षकाराच्या वकिलाने म्हटले आहे.
या खटल्याच्या सुनावणीच्या चौथ्या दिवशी एका मुस्लिम पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. राजीव धवन म्हणाले की, घाईगर्दीने सुनावणी होत असल्याने त्याचा काही वेळा त्रासही होत आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी व शुक्रवारी फक्त नव्या याचिकांची सुनावणी घेण्याची प्रथा आहे. मात्र, ती बाजूला सारून राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी शुक्रवारीही घेण्याचे न्यायालयाने ठरविले आहे. अॅड. धवन म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने रामजन्मभूमी खटल्याबाबत निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. त्या पहिल्या अपिलाची सुनावणी इतक्या घाईने घेण्यात येऊ नये. या खटल्यातील अनेक दस्तावेज संस्कृत, उर्दू भाषेत असून, त्यांचा अनुवाद करण्यात येतो.