कर्नाटकमध्ये भाजपाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने सिद्धारमैय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं आहे. तर कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात मुख्य भूमिका बजावणाऱ्या डी.के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आता उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असलेले डी.के. शिवकुमार हे कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतरही नाखूश आहेत.
डी. के. शिवकुमार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, ‘’विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ हून अधिक जागा मिळाल्या. मात्र तरीही मी नाखूश आहे. माझ्या किंवा सिद्धारमैय्या यांच्या घरी येऊ नका. आमचं पुढचं लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. ती निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने लढली पाहिजे’’. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मिळवलेल्या विजयाचं श्रेय डी.के. शिवकुमार यांना दिलं जात आहे.
डी. के. शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. ६१ वर्षीय डी.के. आठवेळा आमदार म्हणून निवडणूक आले आहेत. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे पक्षातील त्यांचं वजन वाढलं आहे. तसेच हायकमांडचीही त्यांना विशेष मर्जी संपादन झाली आहे. कर्नाटकमधील निवडणूक काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण शक्तिनिशी लढवली. मात्र विजयानंतर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले.
काँग्रेसने अडीअडचणीच्या काळात डी.के. शिवकुमार यांच्यावर अनेकदा विश्वास ठेवला होता. तसेच त्यांनीही संकटकाळात पक्षाला मदत केली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी तसेच अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या आमदारांना एकत्र ठेवण्यामध्ये शिवकुमार यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही शिवकुमार यांच्याकडून काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत.