'आनंदी नाही, आम्ही वाट ...; हायकमांडच्या निर्णयावर डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश म्हणाले,..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:05 PM2023-05-18T13:05:08+5:302023-05-18T13:14:00+5:30
गेल्या दोन दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या.
गेल्या दोन दिवसापासून कर्नाटककाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अनेक बैठका घेऊन काँग्रेसनेकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडवला. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. नवीन राज्य सरकारचा शपथविधी २० मे रोजी बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर प्रस्तावित आहे. दरम्यान, डीके शिवकुमार यांचे भाऊ आणि काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी हायकमांडच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे.
डीके सुरेश म्हणाले, 'मी पूर्णपणे आनंदी नाही पण कर्नाटकच्या हितासाठी आम्हाला आमची वचनबद्धता पूर्ण करायची होती. त्यामुळे डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. आपण भविष्यात पाहू, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला डीके शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे, पण तसे झाले नाही, आम्ही वाट पाहू.
डीके शिवकुमार यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे नवीन उपमुख्यमंत्री आणि सिद्धरामय्या नवीन मुख्यमंत्री असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. “पक्षाच्या व्यापक हितासाठी… का नाही. हायकमांडने निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या जनतेसमोर काँग्रेस पक्षाची आमची बांधिलकी आहे. पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मला AICC अध्यक्ष आणि गांधी परिवारापुढे नतमस्तक व्हावे लागले. पक्षाच्या व्यापक हितासाठी मी सूत्र मान्य करतो आणि का नाही, कारण कधीकधी बर्फ वितळला पाहिजे. शेवटी, कर्नाटकच्या जनतेशी आपण जी बांधिलकी केली आहे, त्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे." कोणाला कोणते पद द्यायचे याची घोषणा होऊ द्या, त्यानंतर बाकीच्या गोष्टी त्यानुसार पुढे जातील, असंही डीके शिवकुमार म्हणाले.
आज संध्याकाळी बेंगळुरू येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. बेंगळुरू येथे होणाऱ्या कार्यक्रमाला गांधी परिवार, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख डीके शिवकुमार यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना आज संध्याकाळी ७ वाजता इंदिरा गांधी भवन, क्वीन्स रोड, बेंगळुरू येथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) केंद्रीय निरीक्षक सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांनाही CLP बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बेंगळुरूला जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रीपदी उमेदवारी देण्यासंबंधीचे बॅनरही लावले आहेत. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे २०२३ रोजी मतदान झाले आणि १३ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. राज्य विधानसभेत काँग्रेसने १३५ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले, भाजपला ६६, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) १९ जागा.