उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:21 AM2024-05-06T10:21:48+5:302024-05-06T10:23:56+5:30
Lok Sabha Election 2024 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत.
DK Shivakumar Slaps A Congress Worker : हावेरी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार एका वादात अडकले आहेत. डीके शिवकुमार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला सर्वांसमोर थप्पड मारली. यासंबंधीचा व्हिडिओ भाजपाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून आता डीके शिवकुमार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत. भाजपाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये डीके शिवकुमार त्यांच्या शेजारी घोषणा देत असलेल्या एका व्यक्तीला थप्पड मारतात. त्यानंतर डीके शिवकुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्या व्यक्तीला मागे ढकलताना दिसत आहेत.
भाजपाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही घटना कर्नाटकातील हावेरीमधील धारवाडमधील सावनूर शहरातील आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी डीके शिवकुमार येथे आले होते. यावेळी लोक डीके शिवकुमार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. डीके शिवकुमार गाडीतून खाली उतरताच स्थानिक नगरसेवक अलाउद्दीन मणियार यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे डीके शिवकुमार इतके नाराज झाले की, त्यांनी त्यांना जोरदार थप्पड मारली.
ಡಿಸಿಎಂ @DKShivakumar ಅವರು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗೆ ಕಪಾಳಮೋಕ್ಷ ಮಾಡಿರುವ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲೆಡೆ ವೈರಲ್ ಆಗುತ್ತಿದೆ.
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) May 5, 2024
ಕಳೆದ ರಾತ್ರಿ ಡಿ. ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸವಣೂರು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿನೋದ್ ಅಸೂಟಿಯವರ ಪರ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದರು.
ಈ ವೇಳೆ… pic.twitter.com/NwwP6091ia
कोण आहेत डीके शिवकुमार?
गेल्यावेळी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. या विजयाचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना जाते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील प्रमुख चेहरा मानले जात होते. मात्र, नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यांचा जन्म 15 मे 1962 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार आहे.
याचबरोबर, डीके शिवकुमार यांना कर्नाटकातील वोक्कालिगा जातीचा प्रमुख चेहरा मानले जाते. तसेच, राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी ते एक आहेत. डीके शिवकुमार आठ वेळा आमदार झाले आहेत आणि काँग्रेस त्यांच्याकडे आपला संकटमोचक म्हणून पाहते. डीके शिवकुमार यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला, त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांचे वर्चस्व वाढले आहे.