Karnataka Elections: सध्या कर्नाटक राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी दुपारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या कॉकपिट खिडकीवर घार आदळल्याने हा अपघात झाला आहे.
शिवकुमार यांचे ट्विटडीके शिवकुमार कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे जाहीर सभेसाठी जात होते. या घटनेनंतर शिवकुमार यांनी ट्विटरवरुन घटनेची माहिती दिली. 'मुलबागलला जात असताना आमच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यात आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. सर्व लोकांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मी सुरक्षित आहे. इमर्जन्सी लँडिंगसाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकाचे आभार मानतो. आता रस्त्याने मुलबागलला जात आहे', असे ट्विट त्यांनी केले.
घारीची हेलिकॉप्टरशी टक्कर शिवकुमार यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हेलिकॉप्टरने बंगळुरुच्या जक्कूर विमानतळावरुन उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर हवेत असताना एक घार त्यांच्यावर आदळली. यामुळे कॉकपिटची काचही फुटली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. शिवकुमार आणि पायलट यांच्यासोबत कन्नड वृत्तवाहिनीचा एक रिपोर्टर होता, जो हेलिकॉप्टरमध्ये त्यांची मुलाखत घेत होता. शिवकुमार यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत.
कर्नाटक निवडणूककर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटक निवडणुकीत 2,613 उमेदवारांपैकी 2,427 पुरुष, 184 महिला आणि 2 इतर आहेत. भाजपकडून 224, काँग्रेसकडून 223 (सर्वोदय कर्नाटक पक्षाच्या पाठिंब्याने), जेडीएसचे 207, आम आदमी पार्टीचे 209, बसपचे 133, सीपीआय(एम), 8 जेडीयू आणि 2 एनपीपीचे उमेदवार आहेत. याव्यतिरिक्त, नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांचे (RUPP) 685 उमेदवार आणि 918 अपक्ष उमेदवार आहेत.