मुंबई - मुंबईतील पवईमध्ये असलेल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आमदारांच्या भेटीला आलेले काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते डी.के. शिवकुमार यांची बंगळुरूला रवानगी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कर्नाटकातील सत्ता संघर्षामध्ये मुंबईतील पवईमध्ये असलेले रेनेसन्स हॉटेल केंद्रबिंदू ठरले आहे. काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार या ठिकाणी आले होते. त्यांना हॉटेलमध्ये पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले होते. बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत आले होते. मात्र त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला होता. तसेच, या आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली होती. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही सकाळपासून बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यामुळे डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बंडखोर आमदारांच्या भेटीस आलेल्या शिवकुमार यांना पुन्हा बंगळुरूला पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 9:54 PM