नवी दिल्ली - सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताहेत. गुरुग्राम येथील खेडकी दौला जमीन खरेदी प्रकरणात हुड्डा आणि वाड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेंद्र सिंह हुड्डा, रॉबर्ट वाड्रा यांच्याव्यतिरिक्त डीएलएफ आणि ओमकारेश्वर प्रॉपर्टीजविरोधातही गुन्हा दाखल केला गेला आहे. कलम 420, 120 बी, 467, 468, 471 या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाड्रा यांच्या स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीनं गुडगावमधील सेक्टर 83, शिकोहपूर, सिंकदरपूर, खेडकी दौला आणि सिहीमध्ये 7.5 कोटी रुपयांची जमिनीच्या खरेदीचा व्यवहार केला. मात्र यानंतर याच जमिनीचा विक्री व्यवहार 55 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
(सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता)
नेमके काय आहे प्रकरण?
2007मध्ये 'स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी' या नावानं कंपनीची नोंदणी करण्यात आली होती. यानंतर 2008मध्ये या कंपनीनं ओमकारेश्वर प्रॉपर्टीजकडून साडेतीन एकर जमीन खरेदी केली, या जमिनीची किंमत साडेसात कोटी रुपये दाखवण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे की, ''निवडणुकांचा काळ आहे, या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ समस्येवरुन जनतेचं लक्ष भरकटवण्यासाठी जवळपास एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरुन काढण्यात आला आहे. यामध्ये नवीन असे काय आहे?''.
दुसरीकडे मानेसरचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, ''हुड्डा, वाड्रा आणि स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएलएफ आणि इतरांविरोधात गुडगावच्या खेडकी दौला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरिंदर शर्मा नावाच्या व्यक्तीनं आमच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये जमिनीच्या खरेदी करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ''
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2014मध्येही भाजपानं वाड्रा यांनी केलेल्या या जमीन खरेदीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना टार्गेट केले होते.