Narendra Modi : "भाजपाकडे विकासाचा मार्ग, इंडिया आघाडीकडे घोटाळे"; मोदींचा डीएमके-काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:32 PM2024-03-15T15:32:37+5:302024-03-15T15:49:39+5:30
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. याच दरम्यान मोदी म्हणाले की, "तामिळनाडूमध्ये यावेळी भाजपाची कामगिरी डीएमके-काँग्रेस इंडिया आघाडीचा अहंकार मोडून काढेल. भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टी असलेल्या कन्याकुमारी येथून आज उठलेली लाट दूरवर पोहोचणार आहे. जनतेला लुटण्यासाठी डीएमके आणि काँग्रेसला सत्तेवर यायचं आहे. 2जी घोटाळ्यात द्रमुकला सर्वाधिक फायदा झाला."
आपल्या जुन्या कन्याकुमारी भेटीच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान म्हणाले की, "1991 मध्ये मी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 'एकता यात्रा' सुरू केली. यावेळी मी काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी त्या लोकांना नाकारलं ज्यांना भारताचं विभाजन करायचं आहे. मला खात्री आहे की तामिळनाडूचे लोकही असेच करतील. भाजपाच्या बाजूने विकासाचे उपक्रम आहेत, इंडिया आघाडीच्या बाजूने घोटाळे आहेत."
#WATCH | During a public rally in Kanniyakumari, PM Modi says, "...The workers of DMK and Congress only know how to cheat and insult women. The people of Tamil Nadu know how the workers of DMK behaved with former state CM J Jayalalithaa...They do politics in the name of women.… pic.twitter.com/LdtJgN5PVc
— ANI (@ANI) March 15, 2024
"आम्ही ऑप्टिकल फायबर आणि 5G दिलं, आमच्या नावावर डिजिटल इंडिया योजना आहे. इंडिया आघाडीच्या नावावर लाखो कोटींचा 2जी घोटाळा झाला आहे आणि त्या लुटीत डीएमके सर्वात मोठा हिस्सेदार होता. उडान योजना आमच्या नावावर आहे, इंडिया आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टॉप्स योजनांमुळे देशाने क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जा मिळवला, पण त्यांच्या नावावर CWG घोटाळा आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.
द्रमुकवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, "द्रमुक हा तामिळनाडूच्या भविष्याचा, तिथल्या संस्कृतीचा शत्रू आहे. अयोध्या मंदिराच्या कार्यक्रमाच्या प्रसारणावर 'बंदी' घालण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मी येथे आलो होतो. द्रमुकने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहूनही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला खडे बोल सुनावले. द्रमुकला देशाचा, तिथल्या संस्कृतीचा आणि वारशाचा तिरस्कार आहे. द्रमुक आणि काँग्रेस महिलाविरोधी आहेत आणि महिलांचा अपमान करतात."
"जेव्हा दिल्लीत संसदेची नवीन इमारत बांधली गेली, तेव्हा आम्ही नवीन इमारतीमध्ये तमिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. पण या लोकांनी यावरही बहिष्कार घातला, त्यांना ते आवडले नाही. जल्लीकट्टूवर बंदी घातली तेव्हा द्रमुक आणि काँग्रेस गप्प राहिले. या लोकांना तमिळ संस्कृती नष्ट करायची आहे. हे आमचे सरकार आहे, एनडीए सरकारने जल्लीकट्टूचा मार्ग मोकळा केला आहे."