चेन्नई - सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधींच्या निधनामुळे त्यांचे तामिळनाडूमधील समर्थक शोकसागरात बुडाले आहेत.
3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घकाळ आपला ठसा उमटवला होता. करुणानिधी यांनी 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले. 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले. 1969 साली डीएमके पक्षाचे प्रमुख एन. अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी यांनी डीएमकेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी डीएमकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यादरम्यान पाचवेळा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.