चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एम. करुणानिधी यांच्यावर कावेरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी सोमवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी केले. या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांच्यावरील उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एम. करुणानिधी यांची तब्येत खालावल्याचे वृत्त पसरताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, त्यांच्या पत्नी दयालू अम्मल या सुद्धा रुग्णालयात उपस्थित आहेत.
एम. करुणानिधी यांना 29 जुलै रोजी तब्येत बिघडल्याने कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार होताना दिसत आहे. आज सायंकाळी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, येत्या 24 तासांत औषधोपचारांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरुन पुढील अंदाज बांधता येतील, असे या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, त्यांच्यावर सतत निगराणी राखली जात असून सुसज्ज वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत.