चेन्नई - डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 94 वर्षीय करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. शुक्रवारी प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री 1.38 वाजता पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना शारीरिक त्रास सुरु झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले. सध्या चेन्नईतील गोदावरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
करुणानिधींच्या शरीरातील ताप आणि संसर्ग वाढत चालला होता. त्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले. त्यावेळी डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष स्टॅलिन यांनीही, करुणानिधींची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. मात्र, मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करुणानिधी यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चेन्नईतील गोपालपूरम या त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. दरम्यान, गोपालपूरमधल्या करुणानिधी यांच्या घराबाहेर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे.