चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कावेरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.
रविवारी रात्री एम. करुणानिधी यांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले. यावेळी सांगितले की, एम. करुणानिधी यांची प्रकृती नाजूक असली तरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांच्या प्रकृतीची काळजी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेत आहे.
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह अनेक नेत्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. दरम्यान, एम. करुणानिधी यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या आवारात गर्दी केली होती. यावेळी त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तसेच त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
एम. करुणानिधी यांची प्रकृती कालच्यापेक्षा आज अधिक सुधारली आहे, अशी माहिती एम. करुणानिधी यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.