Bihar Politics: बिहारमध्ये काही दिवसांच्या उलथापालथीनंतर नितीशकुमार यांनी रविवारी सकाळी राजीनामा दिला आणि सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी ते भाजपच्या साथीने राज्याच्या नव्या एनडीए सरकारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, विरोधक तसेच इंडिया आघाडीतील अनेक नेते नितीश कुमार आणि भाजपवर टीका करत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार एनडीएसोबत असतील याची गॅरंटी काय, अशी विचारणा डीएमके नेत्यांनी केली आहे.
डीएमके नेते आरएस भारती यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर थेट शब्दांत भाष्य केले आहे. थोडी अजून वाट पाहा, असेही ते म्हणाले. डीएमके खासदार टीआर बालू यांनीही बिहारमधील सत्तांतरावर प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार यांचा एनडीएमध्ये समावेश होणे हा विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का आहे, मात्र इंडिया आघाडीचे नेते यांनी ही बाब फेटाळली आहे.
नितीश यांचा एनडीए प्रवेश इंडिया आघाडीसाठी धक्का नाही
टीआर बालू म्हणाले की, नितीश कुमार यांचे एनडीएसोबत जाणे विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी धक्कादायक नाही. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार म्हणाले होते की, विरोधकांच्या आघाडीत काही कामे होत नव्हती. मात्र, नितीश कुमार यांनी कोणतीही योजना समोर आणली नाही. आपण सर्वांनी हिंदीत बोलले पाहिजे, असे ते म्हणत होते. आम्ही त्यावरही काही बोललो नाही. सर्वच पक्षांना जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे, पण ही आघाडी आहे आणि जागावाटपावर चर्चा होत असते. तामिळनाडूमध्ये द्रमुकने २० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा आहे. काँग्रेस आणि द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली असून दुसऱ्या टप्प्यात ९ फेब्रुवारीनंतर चर्चा होईल, अशी माहिती टीआर बालू यांनी दिली.
दरम्यान, नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपचीच साथ घेत मुख्यमंत्रिपदाची नव्याने शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडींबाबत जाेरदार चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीत ते खूश नव्हते. तसेच पक्षात फुटीची भीती, ही दोन मुख्य कारणे नितीश कुमारांच्या पुन्हा भाजपसोबत जाण्यामागे बोलली जात आहेत.