DMK Leader Udhayanidhi Stalin: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यातच विरोधकांकडून केंद्र सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली जात आहे. आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. एका रॅलीला संबोधित करताना उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
...तर यापुढे आम्ही नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू
भाजपा नेतृत्वाखालील केंद्र सरकार समान प्रमाणात निधीचे वाटप करत नाही. राज्यांकडून कर स्वरुपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त २८ पैसे परत मिळतात, असे सांगत केंद्राच्या असमान निधी वाटपावर उदयनिधी यांनी टीका केली. तसेच यापुढे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू, या शब्दांत उदयनिधी यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरण तमिळनाडूमधील मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करेल. केंद्राने तमिळनाडूचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत. तमिळनाडूमध्ये नीट परिक्षा बंद करू, असा इशारा उदयनिधी यांनी दिला. निवडणुका जवळ येतात, तेव्हाच पंतप्रधान तमिळनाडूत येतात. इतरवेळी ते इकडे पाहतही नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभेच्या ३९ जागांसाठी तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.