चेन्नई : वादग्रस्त ठरलेला नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) आणि त्याला होत असलेल्या विरोधाचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी उमटले. द्रमुक आणि त्याच्या मित्रपक्षांनी या कायद्यावर ठराव घेण्यात यावा, अशी मागणी केली व विधानसभेचे अध्यक्ष पी. धनापाल यांनी हा विषय माझ्या विचारात असल्याचे सांगितल्यावर सभात्याग केला.शून्य कालावधीत सीएएचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षनेते एम. के. स्टालिन म्हणाले की, सीएए हा देशाचे ‘ऐक्य आणि एकात्मता’ जपणारा नसल्यामुळे त्याला देशभर विरोध होत आहे. सीएएसंबंधात मी जो प्रस्ताव मांडला आहे तो विचारात घेतला जावा, असे आवाहनही स्टालिन यांनी केले. सीएएवर ठराव घेतला जावा, अशी विनंती करणारा अर्ज द्रमुकने काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या सचिवालयाला दिला होता. केरळ विधानसभेने सीएएविरोधात ठराव संमत केला तसा ठराव राज्याच्या विधानसभेनेही संमत करावा, अशी मागणी स्टालिन करीत आहेत.पी. धनापाल म्हणाले की, स्टालिन यांचा सीएएविरोधात ठराव संमत करावा या मागणीचा अर्ज माझ्या विचारात असून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यांच्या अर्जावर विचार सुरू असताना स्टालिन हे त्या विषयाच्या अत्यावश्यक मूलभूत तपशिलात जाऊ शकत नाहीत.मी माझा निर्णय (प्रस्ताव मांडण्याचा) तुम्हाला कळवी, असे धनापाल म्हणाले. तरीही द्रमुकचे सदस्य उभे राहून स्टालिन यांचा प्रस्ताव मांडण्यास परवानगी द्या, अशी मागणी करीत होते.द्रमुकचे सभागृहातील उपनेते दुराईमुरूगन यांनी नियोजित प्रस्ताव विचारात घेतला जाईल, असे आश्वासन धनापाल यांना मागितल्यावर ते म्हणाले की, विषयाचा अभ्यास केल्यानंतर प्रस्ताव मांडू देण्याचा निर्णय घेतला जाईल.>मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी पहारेकरी आहेपठार प्रतिमा (पश्चिम बंगाल) : मी पहारेकरी आहे आणि जर कोणी लोकांचे अधिकार हिसकावून घेत असेल तर, त्यांना आपल्या मृतदेहावरून जावे लागेल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सुंदरबन जंगलाच्या पश्चिम भागात एक सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, आम्ही कुणाच्या दयेवर जगत नाही. मी कुणालाही आमचे अधिकार हिसकावू देणार नाही. मी आपली पहारेकरी आहे. राज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी मी आवश्यक ते सर्व काही करेल.
तामिळनाडू विधानसभेत द्रमुकचा सभात्याग, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 6:13 AM