तामिळनाडूचे राज्यगीत तमिळ थाई वाल्थूवरून सुरू झालेला हिंदी आणि तमिळ वाद संपायचे नाव घेत नाही. द्रमुकचे नेते आणि राज्यसभा खासदार एमएम अब्दुल्ला यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्या हिंदीत लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना त्यांनी हिंदी समजत नसल्याचे म्हटले आहे.अधिकृत पत्र इंग्रजीत पाठवावे, अशी विनंती एमएम अब्दुल्ला यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना केली आहे.
एमएम अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या २१ ऑक्टोबरच्या पत्रानंतर आली आहे, ज्यामध्ये ट्रेनमधील स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी हिंदीत लिहिले होते की, "तुम्हाला आठवत असेल की ५ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यसभेत विशेष उल्लेखाखाली तुम्ही रेल्वेने पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता, स्वच्छता, ट्रेन आणि स्थानकांमध्ये अनधिकृत विक्री थांबवण्याबद्दल लिहिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे."
दरम्यान, रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे पत्र नेहमी हिंदीत असते, असे एमएम अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले. तसेच, ते म्हणाले, मी त्यांच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की मला हिंदी येत नाही, कृपया पत्र इंग्रजीत पाठवा, पण पत्र हिंदीत होते. तसेच, एमएम अब्दुल्ला यांनी केंद्रीय मंत्री बिट्टू यांना तामिळमध्ये विनंती केली की, आतापासून त्यांना अधिकृत पत्र इंग्रजीत पाठवावे.
सध्या तामिळ-हिंदी वाद चर्चेतचेन्नई दूरदर्शनच्या सुवर्णमहोत्सवी समारंभ तसेच हिंदी महिन्याच्या समारोप समारंभाच्या संदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपाल आरएन रवी यांच्यात नुकताच जोरदार वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले होते की, "बहुभाषिक देशात, बिगरहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी महिना साजरा करणे हा इतर भाषांना अपमानित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते. त्यामुळे माझे म्हणणे आहे की, बिगर हिंदी भाषिक राज्यांनी असे हिंदी-आधारित कार्यक्रम टाळले पाहिजेत आणि त्याऐवजी संबंधित राज्यांमध्ये स्थानिक भाषा महिना साजरा करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे."