चेन्नई: तामिळनाडूत प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या, मात्र सध्या विरोधी पक्षात असलेल्या द्रमुकनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी द्रमुकनं अनेक घोषणा केल्या आहेत. यातील दोन घोषणा सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या आहेत. सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करू, नोटाबंदीतील पीडित व्यक्तींच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देऊ, अशी आश्वासनं द्रमुककडून देण्यात आली आहेत.आज द्रमुकनं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. राजीव गांधींच्या खून प्रकरणात सहभागी असलेल्यांची सुटका करू, हे द्रमुकनं दिलेलं आश्वासन वादग्रस्त ठरलं आहे. याआधीही द्रमुकनं अनेकदा राज्य सरकार आणि राज्यपालांकडे हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याची मागणी केली आहे. मात्र आता थेट जाहीरनाम्यात याबद्दल आश्वासन दिल्यानं दक्षिणेतील राजकारण तापलं आहे. सत्तेत आल्यास पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असं आश्वासनही द्रमुकनं दिलं आहे. श्रीलंकेतून आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व, मनरेगाच्या अंतर्गत 150 दिवसांमध्ये रोजगाराची हमी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ, राज्याला नीट परीक्षेतून सवलत अशी अनेक आश्वासनं द्रमुककडून देण्यात आली आहेत. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी 18 एप्रिलला मतदान होईल. द्रमुक राज्यातील 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
...तर नोटाबंदीची झळ बसलेल्यांना भरपाई देऊ; 'या' पक्षाचं मतदारांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:01 PM