नवी दिल्ली : केवळ डीएनए चाचणीद्वारेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी वादाला पूर्णविराम दिला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारत भेटीवर येऊ तेव्हा तशी औपचारिक विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे त्यांच्या कन्या अनिता पाफ यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच केंद्र सरकारने नेताजींसंबंधी फाईल्स खुल्या केल्याबद्दल त्यांनी स्वागत केले.नेताजी बोस यांनी इमिली शेन्कील यांच्यासोबत लग्न केले होते. ७३ वर्षीय अनिता पाफ या त्यांच्या कन्या आहेत. नेताजींच्या अस्थी जपानच्या रेन्कोजी विहारात ठेवण्यात आल्या असून, त्यांची डीएनए चाचणी घेतली जाऊ शकते, असे त्या जर्मनीतील आॅग्सबर्ग येथील आपल्या निवासस्थानी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. नेताजींसंबंधी दस्तऐवजात काही तरी महत्त्वाचे असावे अन्यथा ते ७० वर्षांपेक्षा जास्त काळ गोपनीय श्रेणीत राहिले नसते, असेही त्या म्हणाल्या. १९४५ मध्ये माझे वडील विमान अपघातात मृत्यू पावले या कथनावर मी विश्वास ठेवते, कारण अद्यापही पुराव्यांबाबत स्पष्टता नाही; मात्र मला त्याबाबत आश्चर्य वाटत नाही. कारण तुम्ही तशी अपेक्षा कशी करू शकता? मोठी अनिश्चितता आणि उलथापालथ होत असताना जपानने शरणागती पत्करण्याच्या तीन दिवस आधी हे विमान कोसळले. रेन्कोजी विहारात पुरण्यात आलेल्या हाडांची डीएनए चाचणी केली जाऊ शकते. त्या अस्थी माझ्या वडिलांच्या नसतीलही; पण त्यामुळे त्यांचा मृत्यू विमान अपघात झाल्याच्या कथनाला स्पष्टपणे छेदही देता आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
डीएनए चाचणीतूनच नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल
By admin | Published: January 25, 2016 1:50 AM