नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी बातचीत करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. स्वत:च्या राजकीय लाभासाठी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्यानं नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं मनोज यांनी मोदींना सांगितलं.
कंपन्या आल्यासोबत जमीनही नेतात का?; शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींचा विरोधकांवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 1:49 PM