ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयआयटी वगळता केंद्रीय अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता १२ वीतील मार्कांची आवश्यकता भासणार नाही. सेंट्रल सीट ऐलोकेशन बोर्डाने (सीएसएबी) तसा प्रस्तावच मांडला असून या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास विद्यार्थ्यांची डोकेदुखी कमी होणार आहे.
सध्या आयआयटी वगळता अन्य केंद्रीय अनुदान मिळणा-या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२ वीच्या गुणांना ४० टक्के वेटेज दिले जाते. उर्वरित ६० टक्के वेटेज हे जेईई परीक्षेतील गुणांना दिले जाते. विविध बोर्डाकडून सीबीएसईला १२ वीचे गुण देण्यास विलंब होतो. या गोंधळामुळे या वर्षी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे आले होते. या पार्श्वभूमीवर सीएसएबीने मनुष्यबळ विकास खात्याकडे प्रस्ताव दिला असून यात आयआयटी वगळता अन्य केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी जेईईलाच संपूर्ण वेटेज दिले जावे असे म्हटले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळते का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास एनआयटी व अन्य केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी १२ वीच्या गुणांची आवश्यकता राहणार नाही.