नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार निय़ामक प्राधिकरणने (TRAI) देशातील सर्व केबल टीव्ही वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. नवीन योजनेनुसार केबल आणि डीटीएच ग्राहक त्यांच्या पसंतीचे चॅनेल निवडू शकणार आहेत. यामुळे त्यांना अन्य चॅनेलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. याबरोबर टीव्ही ब्रॉडकास्टर्सना त्यांच्या चॅनेल आणि पॅकेजची सर्वाधिक किंमत जाहीर करावी लागणार आहे.
सर्व ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे चॅनेल दाखवावे लागणार आहेत. शिवाय त्यानुसारच पैसे आकारावे लागणार आहेत. यामुळे नव्या योजनेनुसार टीव्ही पाहणे स्वस्त होणार असल्याचा दावा ट्रायने केला आहे. सध्याच्या योजनांनुसार ग्राहकांना कंपन्या त्यांनी बनविलेली पॅकेज देत होत्या. यामुळे एखादा चॅनेल किंवा पॅकेज हवे असल्यास बळजबरीने जादा पैसे मोजावे लागत होते. नवा नियम जाहीर केल्यानंतर कंपन्यांनी टीव्हीवर 29 डिसेंबरची भीती दाखवत चॅनेल निवडण्य़ाची सक्ती केली होती. यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, हा दुष्प्रचार पाहून ट्रायने मुदत वाढविली आहे.
ट्राय़ने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक आता पहिल्यापेक्षा अर्ध्या किंमतीत चॅनल पाहू शकणार आहेत. मात्र, डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या ट्रायच्या ग्राहकहिताचा निर्णय टाळण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण त्यांना जुन्या पद्धतीने जादा मलिदा मिळत होता. स्पोर्ट, किड्स, मनोरंजन सारखे चांगले चॅनेल बेस पॅकेजच्या बाहेर ठेवून अव्वाच्या सव्वा लूट सुरु होती.