नवी दिल्ली: ‘एक्झिट पोल’नी वर्तविलेल्या अंदाजांनी खचून न जाता काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वत:वर आणि पक्षावर विश्वास ठेवावा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केले.
सर्वच ‘एक्झिट पोल’नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’चे सरकार स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येण्याचे अंदाज वर्त विले असताना गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणारे टिष्ट्वट हिंदीमधून केले.
कार्यकर्त्यांना उद्देशून राहुल गांधी यांनी म्हटले की, पुढील २४ तास महत्वाचे आहेत. सावध आणि दक्ष राहा. अजिबात घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. बनावट ‘एक्झिट पोल’च्या अपप्रचाराने निराश होऊ नका. स्वत:वर आणि पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही.
याआधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही कार्यकर्त्यांचा हुरुप वाढविण्यासाठी सोमवारी अशाच आशयाचा व्हिडिओ संदेश जारी केला होता. त्यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हतोत्साहित करण्यासाठी मुद्दाम अफवा पसरविल्या जात आहेत व त्याच रोखाने ‘एक्झिट पोल’चे अंदाजही वर्तविले जात असल्याचे म्हटले होते. मात्र या कशाही मुळे धीर न सोडता उलट अशा वेळी कार्यकर्त्यांनी अधिक दक्ष राहून ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्रावर पहारा द्यायला हवा, असे म्हणत त्यांनी ‘तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल’, अशी खात्रीही कार्यकर्त्यांना दिली होती.