लखनऊ : समाजवादी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर प्रगतिशील समाजवादी पार्टीची (लोहिया) स्थापना करणारे शिवपाल यादव यांनी रविवारी लखनऊमध्ये जनआक्रोश रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी शिवपाल यादव यांनी वादग्रस्त राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, अयोध्येत बाबरी मस्जिदच्या जागी राम मंदिर बांधू नये. त्याऐवजी राम मंदिर सरयू नदीच्या किनाऱ्यावर मंदिर बांधावे. पुन्हा सांप्रदायिक वाद निर्माण होत आहेत. याचबरोबर, शिवपाल यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. आम्ही भाजपाला सत्तेतून हटविण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण, आज दलित, मागास, शेतकरी, तरुण एकत्र आले आहेत. ही रॅली निर्णय आणि परिवर्तन यासाठी बोलवली आहे. भाजपा सरकारवर जनता नाराज आहे. देश संकटात आहे. जवान शहीद होत आहेत, असे शिवपाल यादव म्हणाले.
आमच्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहेत. भारतीय शेतकरी संघटनेचे लोक आहेत. नेताजी (मुलायम सिंह यादव) सुद्धा आमच्यासोबत आहेत. आम्ही गेल्या 40 वर्षे एकत्र आहेत. नेताजींनी केलेल्या आदेशाचे पालन करत आहे, असेही शिवपाल यादव म्हणाले.