नवी दिल्ली : एकविसावे शतक विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे आणि सर्वांगिण विकास हवा आहे. लोकजीवनाचे रहाणीमान सुधारतांना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी व्हायला नको, सुंदर शहरांंबरोबर सुंदर जंगलेही हवीत. स्मार्ट शहरे बनवता बनवता रावणाच्या लंकेची निर्मिती व्हायला नको? सरकारने याची काळजी घ्यायला हवी, असा इशारा हरयाणाचे राज्यपाल कप्तानसिंग सोलंकी यांनी दिला.दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबच्या सभागृहात कल्पक व क्रियाशील मराठी सनदी अधिकारी व हरयाणातल्या जिंद चे उपायुक्त अजित जोशी यांच्या ‘बर्डस आॅफ बिंदावास’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळयाचे प्रमुख अतिथी या नात्याने राज्यपाल सोलंकी बोलत होते. सोहळयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांचीही शुभेच्छापर भाषणे झाली.हरयाणाच्या जज्झर जिल्ह्यात बिंदावास पक्षी व वन्यजीवांचे विलक्षण सुंदर अभयारण्य आहे. जज्झरचे जिल्हाधिकारी असतांना अजित जोशींनी बिंदावास अभयारण्याचा कल्पकतेने वेध घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून २६0 प्रकारच्या पक्षांचे आवाज, त्यांच्या वेधक हालचाली व मनोहारी छायाचित्रे त्यांनी टिपली. या कार्यात त्यांना सतिश पांडे, निरंजन संत व प्रमोद देशपांडेंची सक्रीय मदत झाली. बर्डस आॅफ बिंदावास या संग्राह्य पुस्तकाची त्यातूनच निर्मिती झाली.जोशींच्या संकल्पनेची स्तुती करताना जावडेकर म्हणाले, निसर्ग कायम नवनवे पक्षी, नवनव्या वनस्पतींना जन्म देतो, निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. सरकारी फायलीत अडकून न पडता जोशींसारख्या सनदी अधिकाऱ्याने छंद म्हणून त्याचा अचूक वेध घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. जलवायु परिवर्तनाच्या कालखंडात भारतात पर्यावरणाचे रक्षण हे एक आव्हान आहे. ‘बर्डस आॅफ बिंदावास’ हे जोशींचे पुस्तक,वेबसाईट व मोबाईल अॅप त्या विषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करील. (विशेष प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी चे रूपांतर रावणाच्या लंकेत नको : राज्यपाल सोलंकी
By admin | Published: September 24, 2015 1:07 AM