नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात काही समुदायांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत गुरुवारी फेटाळून लावला. भाजप सरकार जात, पंथ आणि धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही. हे सरकार ‘सब का साथ, सब का विकास’ या भावनेने काम करते, असेही ते म्हणाले. शून्य प्रहरात काँग्रेसचे सदस्य रणजित रंजन यांनी उत्तर प्रदेशात रोमिओविरोधी पथकांकडून सुरू असलेली कारवाई आणि काही कत्तलखाने बंद केल्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकार काही विशिष्ट समुदायांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप रणजित रंजन यांनी केला होता.त्यावर राजनाथसिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशात नवे सरकार सत्तारूढ होऊन दोन-तीन दिवसच झाले आहेत. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, भाजप सरकार जात, पंथ आणि धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही. सब का साथ, सब का विकास या भावनेने काम करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे.
जात-धर्माचा भेदभाव करत नाही
By admin | Published: March 24, 2017 12:29 AM