गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला. जय शहाबद्दल एक ओळ तरी बोला मोदी, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या मोदी सरकारने सुरु केलेल्या योजना अपयशी ठरल्या पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली.
ती म्हणजे जय शहाची कंपनी. जय शहाच्या कंपनीने इतक्या वेगाने कशी प्रगती केली ? असा सवाल राहुल गांधींनी गांधीनगर येथील सभेत विचारला. वर्षअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय रण पेटले असून, भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. अल्पेश ठाकोर, जिगनेश मेवानी, हार्दिक पटेल यांनी दाखवून दिले गुजरात शांत बसणार नाही.
तुम्ही गुजरातचा आवाज दाबू शकत नाही तसेच तो खरेदीही करु शकत नाही असे राहुल गांधी म्हणाले. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या आवाजाने महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा. मागच्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये लोकांचे सरकार नव्हते. पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार होते असा आरोप राहुल यांनी केला. गुजरातच्या जनतेला नोकरी, चांगले शिक्षण हवे आहे. पण भाजपा सरकार या गोष्टी जनतेला देण्यात अपयशी ठरली आहे असे राहुल गांधी म्हणाले. जेव्हा तुम्ही सेल्फी घेण्यासाठी बटण क्लिक करता तेव्हा चीनमधल्या युवकाला रोजगार मिळतो असे राहुल म्हणाले.
मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित मोदींनी रविवारी भावनगरमध्ये रो-रो सेवेचे उदघाटन करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2014 च्या आधी केंद्रात सतेवर असलेल्या काँग्रेसने गुजरातचा विकास रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केला असा आरोप केला. वापी ते कच्छच्या मांडवीपर्यंत विकास रोखण्यात आला. उद्योग पर्यावरणाच्या नावाखाली बंद करण्याची धमकी दिली. विकासाला टाळ लावण्याची धमकी दिली. मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी मला किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित आहे असे मोदी म्हणाले.