सहारनपूर (उत्तर प्रदेश) : आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे काय, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे झालेल्या सभेत केला. या वेळी त्यांनी दोन वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान म्हणाले, लाखो लोकांसमोर असा हिशेब देण्याची हिंमत दोन वर्षांपूर्वी नव्हती. कधीकधी मी चकित होतो व जनतेचा पैसा लुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसविले जाते काय, असाही प्रश्न मनात येतो. आमचे सरकार केवळ गरिबांसाठीच काम करणारे आहे. गॅस सिलिंडर आणि शेगडी ही पूर्वी केवळ श्रीमंतांसाठीच होती. गरिबांना लाकूड जाळत चुलीवरच आयुष्य काढावे लागत होते. पण आम्ही गरिबांसाठी धोरण ठरविले. एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सबसिडीचा त्याग केला. त्याच आधारावर आम्ही तीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस देणार आहोत, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. येत्या १५ जूनपर्यंत मोदी इतरही राज्यांत अशा सभा घेणार आहेत. (वृत्तसंस्था)सर्व सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेदेशात असलेली डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय संपूर्ण देशात सरसकटपणे ६५ वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी येथे केली. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. काही राज्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर काही राज्यांत ते ६२ वर्षे आहे. पुरेशी वैद्यकीय महाविद्यालये असती तर डॉक्टरांची संख्याही वाढली असती व आता जाणवतो आहे तसा डॉक्टरांचा तुटवडा जाणवला नसता. दोन वर्षांत डॉक्टर तयार करणे कठीण आहे. परंतु गरिबांना डॉक्टरशिवाय जगण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही. त्यामुळे याच आठवड्यात आमचे मंत्रिमंडळ निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेईल. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनुभवी अध्यापकांच्या सेवांचा लाभ अधिक काळ मिळेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.सर्व समस्यांचे उत्तर केवळ विकासात आहे. आमचे मंत्री देशभरात जातील. आपल्या कामाचा हिशेब देतील. कारण सरकारचे धोरण आणि हेतू दोन्ही स्पष्ट आहेत. देशाचा विकास, गरिबांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू आहे. या विकास यात्रेत जनतेने भागीदार व्हावे. सरकार आमच्यासाठी काय करणार, काय करीत आहे, हे जाणून घेणे हा लोकांचा अधिकार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही - मोदी
By admin | Published: May 27, 2016 4:45 AM