नवी दिल्ली : चुकीची वजावट दाखविणारे अथवा कमी उत्पन्न दाखविणारे आयकर विवरणपत्र दाखल करू नका, असा इशारा प्राप्तिकर विभागाने नोकरदार वर्गाला दिला आहे. बंगळुरू, मुंबई आणि लुधियाना येथे अशा प्रकारचे अपप्रकार आढळून आल्यानंतर विभागाने हा इशारा जारी केला आहे.प्राप्तिकर विभागाच्या वतीने आठवड्याच्या सुरुवातीला यासंबंधी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, असे करणे प्राप्तिकर कायद्याच्या विविध कलमांखाली शिक्षापात्र गुन्हा आहे. अशी विवरणपत्रे भरण्यासाठी अप्रामाणिक मध्यस्थांची मदत घेऊ नका. या घटना चौकशीसाठी अन्य कायदेपालन संस्थांकडे सोपविल्या जातील.एका वरिष्ठ कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही नोकरदार आपल्याकडे घर नसतानाही घरांसाठी असलेली कर सवलत घेत असल्याचे बंगळुरू, मुंबई आणि लुधियाना येथे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. काही लोकांनी विशिष्ट संस्थांना कोणत्याही प्रकारच्या देणग्या दिल्या नसतानाही देणग्या दिल्याचे दाखवून त्यासंबंधीच्या कर सवलती लाटल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ही सूचना प्राप्तिकर विभागाने जारी केली आहे.सूत्रांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहणे प्राप्तिकर विभागाला सोपे झाले आहे. त्यामुळे करदात्यांनी अशा गैरप्रकारांपासून दूर राहावे, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
सीबीआय चौकशीसूत्रांनी सांगितले की, बंगळुरू आणि लुधियानामधील अशा काही घटना तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्यात आल्या आहेत. बंगळुरात सीए असल्याची बतावणी करणाºया एका इसमाने काही आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांतील कर्मचाºयांना चुकीच्या पद्धतीने कर सवलत मिळवून दिल्याचे आढळून आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने बारकाईने चौकशी सुरू केली.