नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर विश्वसुंदरीचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या मानुषी छिल्लरची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तिने 'मिस वर्ल्ड'ची स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. मात्र, तिच्या आडनावावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण, मजेशीर टिप्पणी करायला गेलेल्या शशी थरूर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. याबद्दल शशी थरूर यांनी जाहीर माफी मागत नेटिझन्सना शांत राहण्याचा सल्ला दिला.मानुषी छिल्लरने आपल्या शैलीत शशी थरूर यांना उत्तर दिले आहे. तिने ट्विट करून म्हटले आहे की, जग जिंकणारी मुलगी दुसऱ्यांच्या फुटकळ बोलण्याने निराश होणार नाही. 'चिल्लर'चा अर्थ सुट्टे पैसे असा असला तरी, 'चिल्लर'मध्ये 'चिल'चा देखील समावेश आहे, हे विसरू नका, असे सांगत मानुषीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, मानुषीच्या या 'चिल' म्हणजे कूल उत्तराची दखल घेत शशी थरूर यांनी तिच्या उमदेपणाचे कौतुक केले आणि पुन्हा एकवार तिची माफी मागितली. प्रत्येक भारतीयासारखा मलाही तुझा अभिमान आहे, असेही शशी थरूर म्हणाले.
'मिस वर्ल्ड 2017' चा किताबभारताच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकला आहे. चीनमध्ये मिस वर्ल्ड 2017चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. या स्पर्धेत दुस-या स्थानावर मिस मेक्सिको आणि तिस-या क्रमांकावर मिस इंग्लंडनं मान मिळवला आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.