मुंबई, दि. 13 - आपल्या स्पष्ट आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्द असलेले बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर सध्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या भाषणावर ऋषी कपूर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून ऋषी कपूर यांनी राहुल गांधींना चांगलंच झापलं आहे. राहुल गांधी यांनी घराणेशाहीचा उल्लेख करताना बॉलिवूडचं उदाहरण देणं ऋषी कपूर यांना आवडलेलं नाही. राहुल गांधी यांनी घराणेशाहीबद्दल बोलताना राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत सगळीकडे घराणेशाही असून आपला देश त्याच्यावरच चालतो असं सांगितलं होतं.
ऋषी कपूर यांनी सलग तीन ट्विट करत राहुल गांधी यांना झापलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'राहुल गांधी. 106 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचं योगदान 90 वर्ष आहे. प्रत्येक पिढीला लोकांनी मेरिटच्या आधारे निवडलं आहे'. यानंतर केलेल्या दुस-या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, 'देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी आहे - पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर. याशिवाय अजूनही'.
यानंतर केलेल्या तिस-या ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी आपला सगळा संताप व्यक्त केला आहे. 'यामुळे घराणेशाहीवर बकवास करु नका. मेहनत करुनच लोकांचं प्रेम आणि आदर मिळवता येते. जबरदस्ती आणि गुंडगिरी करुन मिळवता येत नाही'.
‘वादग्रस्त ट्विट करू नका अन्यथा अकाउंट बंद करा’, ऋषी कपूर यांना अल्टिमेटमऋषी कपूर यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त ट्विट केले आहेत. या ट्विट्समुळे अनेकदा ते अडचणीतही आले आहेत. ब-याचदा तर त्यांचे ट्विट माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. आता पुढच्या काळात त्यांच्या ट्विटमुळे आणखी काही प्रताप घडू नये म्हणून त्यांच्या परिवाराकडूनच त्यांना अल्टिमेटम देण्यात आला होता. ऋषी यांची पत्नी नितू कपूरने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘वादग्रस्त ट्विट करू नका अन्यथा अकाउंट बंद करा.’
घराणेशाहीवर नेमके काय म्हणाले होते राहुल गांधी?घराणेशाहीवरुन राहुल गांधी यांनाही टार्गेट केले जाते. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'घराणेशाहीवरुन केवळ काँग्रेस पक्षावर निशाणा साधू नये, आमच्या देशात अशाच पद्धतीनं काम चालत आहेल आहे. अखिलेश यादव, एम.के.स्टॅलिन, एवढंच नाही तर राहुल यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीचं उदाहरण देण्यासाठी अभिषेक बच्चनच्याही नावाचा उल्लेख केला. त्यामुळे घराणेशाहीसंदर्भात मी काहीही करु शकत नाही, असेही पुढे ते म्हणालेत. आता तर मुकेश अंबानी यांच्यानंतर इन्फोसिसमध्येही घराणेशाही दिसून येत असल्याचं त्यांनी विधान केले.