लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही कार्यक्रमात कोणीही पुष्पगुच्छ देऊ नये, असा फतवा केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना काढला आहे.मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, पंतप्रधान राज्यात दौऱ्यावर येतील तेव्हा कोणत्याही कार्यक्रमात त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांना कोणीही पुष्पगुच्छ देऊ नये. त्याऐवजी पंतप्रधानांना खादीच्या रुमालासह एक फूल किंवा एखादे पुस्तक दिले जावे.या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी सर्व संबंधितांना याची नीट कल्पना द्यावी, असेही गृह मंत्रालयाने नमूद केले आहे.एक महिन्यापूर्वी १७ जून रोजी केरळमध्ये पी.एन. पण्णिकर वाचकदिनाच्या कार्यक्रमात स्वत: मोदी यांनी पुष्पगुच्छाऐवजी एखादे पुस्तक देऊन स्वागत करण्याचा विचार बोलून दाखविला होता. अर्थात त्यांचे हे आवाहन फक्त स्वत:पुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी नागरिकांना उद्देशून तसे सांगितले होते. सरकारी फतव्याने इतरांना सक्ती करता येणार नाही. त्यामुळे अधिकृत सरकारी प्रथा म्हणून आधी आपण यास सुरुवात करावी. मग नागरिक त्याचे अनुकरण करतील, असा यामागचा विचार दिसतो.
मोदींना पुष्पगुच्छ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:31 AM