ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - बिहार निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यातील वाक् युद्धही चांगलेच रंगलेले दिसत आहे. निर्यातीच्या आकड्यांमध्ये सतत होणा-या घसरणीचा दाखला देत नीतिश कुमारांनी मोदींना त्यांच्या 'अच्छे दिन' च्या आश्वासनावरून चांगलच डिवचल आहे. ' मोदीजी, अच्छे दिन तो छोडिये, हमे हमारे पुराने दिन ही लौटा दीजिये' असे ट्विट नीतिश कुमार यांनी केले आहे.
बिहार निवडणउकीच्या दोन टप्प्यांतील मतदान शांततेने पार पडलेले असतानाच अद्याप तीन टप्पे बाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून बिहारची सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक प्रचारसभेत नीतिश कुमारांवर कडाडून टीका करणा-या मोदींना नीतिश कुमारही सडेतोड प्रत्युत्तर देताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरूनही मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.
गेल्या दहा महिन्यात निर्यातीत सतत घट होत आहे, निर्यातीने यावर्षई नीचांकी पातळी गाठली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. मोदीजी, आता अच्छे दिन जाऊ देत, आम्हाला आमचे जुनेच दिवस परत द्या, असा सणसणीत टोला नीतिश कुमार यांनी लगावला आहे.
नीतिश कुमार यांच्या टीकेला आता मोदी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.