Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. परंतु, प्रत्यक्षात भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. एनडीतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये भाजपा नेत्या स्मृति इराणी यांचाही समावेश आहे. यातच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत स्मृति इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केला होता. परंतु, या लोकसभा निवडणुकीत अमेठी येथे स्मृति इराणी यांचा पराभव झाला. अमेठीतून केएल शर्मा विजयी झाले. यानंतर स्मृति इराणी यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत स्मृति इराणी यांचा अपमान करू नये, असे म्हटले आहे.
स्मृति इराणींचा अपमान करू नका
आयुष्यात हार-जीत होतच असते. स्मृति इराणी यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणे टाळावे, अशी सर्वांना विनंती करतो. लोकांना अपमानित करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा अधिवेशनात राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचार, अग्निवीर योजना यांसह अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी एनडीए सरकारवर घणाघाती टीका केली. या टीकेचा पंतप्रधान मोदी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.