कुट्टानाड : केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले. राज्यातील सत्तारूढ यूडीएफ आणि एलडीएफ यांच्याविरुद्ध हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, ‘या दोन्ही आघाड्यांनी एवढ्या वर्षांपर्यंत केरळमध्ये राज्य केले, पण त्यांना साधी पाण्याची समस्याही सोडविता आली नाही. काँग्रेस आणि माकपा एकमेकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा त्यांचा पराभव होईल, तेव्हाच त्यांना कळेल की, सरकारला जनतेसाठीही काम करावे लागते.’केरळ चारही बाजूने पाण्याने वेढलेले राज्य आहे, परंतु येथे अद्यापही पेयजल नाही. भारत पुढच्या वर्षी स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण करणार आहे. या काळात राज्यात एका पाठोपाठ एक अशी काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सरकारे सत्तेवर आली, पण त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देता आले नाही. साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून न देणाऱ्यांना निवडून देणार काय? भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप होतो, तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र येतात, असा आरोप मोदींनी केला. (वृत्तसंस्था)
केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा
By admin | Published: May 09, 2016 3:19 AM