नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच कन्हैय्या कुमार यांची पाठराखणही करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी सकाळी ट्विट करून केजरीवाल यांनी मोदी सरकारचे काम म्हणजे देशद्रोह असल्याचे म्हटलंय. कन्हैय्या कुमारचं माहित नाही, पण दिल्ली सरकारच्या कामाकाजात अडथळा आणून नरेंद्र मोदी देशद्रोह करत नाहीत का? असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी विचारला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन लिहिले की, कन्हैय्या कुमारने देशद्रोह केला की नाही हे मला माहिती नाही, पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे. मात्र, तिकडे मोदीजींनी दिल्लीतील मुलांची शाळा बंद केली, दवाखाने थांबवले, सीसीटीव्ही कॅमेरेही थांबवले, मोहल्ला क्लिनिकही बंद केले, दिल्ली ठप्प करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मग, हा देशद्रोह नाही का ? असा प्रश्न केजरीवाल यांनी आपल्या ट्विटवरुन विचारला आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार नेहमीच दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे सातत्याने मोदी सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. तर, तीन वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाचा नेता कन्हैय्या कुमार यांच्यावर देशविरोधी घोषणा दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, कन्हैय्या यांना काही उजव्या विचारांच्या संघटनांकडून देशद्रोही मानण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले होते. मात्र, हायकोर्टाने या दोषारोपपत्रावर आक्षेप घेत पोलिसांनाच उलट सवाल केले आहेत.