महाराष्ट्र दिनीच कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.
नवी दिल्ली- महाराष्ट्र दिनीच महाराष्ट्रातल्या गडचिरोलीतल्या कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात नक्षलींनी जवानांची गाडी उडवून दिली, या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.पंतप्रधान म्हणाले, सर्वच शूरवीर जवानांना मी सलाम करतो. त्यांचं बलिदान कधीही विसरता येणारं नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे. जवानांचं वाहन घातपात करून उडवून देणाऱ्या 'त्या' नक्षलवाद्यांना सोडणार नसल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.गडचिरोली सी-60 पथकाचे 16 जवान शहीद झाले आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी राज्यातील डीजीपी आणि गडचिरोलीच्या एसपींच्या संपर्कात असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला होता.छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे मध्यरात्रीपासून पहाटे 3.30 दरम्यान घडली.त्यानंतर आज कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 16 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.