बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:28 AM2019-05-28T06:28:25+5:302019-05-28T06:28:40+5:30
काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. त्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.
प्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.
>प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे
निवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.