नवी दिल्ली : सर्व राज्यांनी आपापल्या सीमा परिणामकारकपणे सील कराव्यात आणि पोटासाठी परराज्यांतून आलेल्या एकाही स्थलांतरित मजूर वा कामगारास घरी परत जाण्यासाठी राज्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी सक्त ताकीद केंद्र सरकारने रविवारी दिली.
दिल्लीतून घरी परत निघालेल्या हजारो स्थलांतरित कामगारांना दिल्ली सरकारने शेकडो बसने सीमेपर्यंत नेऊन सोडणे व त्यांना तेथून गावोगावी पोहोचविण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने १२०० सरकारी बसची व्यवस्था करण्यामुळे शनिवारी राजधानीत ‘लॉकडाऊन’चा उघडपणे फियास्को झाला.
या प्रकारावर सर्वदूर टीका झाल्यानंतर कॅबिनेट सचिव राजीव गौबा व केंद्रीय गृहसचिव यांनी राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी करून वरीलप्रमाणे सक्त तंबी दिली. २१ दिवसांचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ ऐनवेळी लागू केल्याने लाखो स्थलांतरित कामगारांचे गेले तीन दिवस जे अतोनात हाल झाले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’मधून हात जोडून क्षमायाचना करीत असतानाच दुसरीकडे ही तंबी दिली गेली, हे लक्षणीय आहे. निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी व्यक्तिश: जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाºयांवर टाकण्यात आली.
देशातील मृतांची संख्या २७ वर
च्देशभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २७ वर पोहोचली आहे. भारतभरातील रुग्णांच्या संख्येने हजाराची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण लॉकडाऊनमध्ये आहोत. या काळात मानसिक स्वास्थ्याबाबत काही समस्या निर्माण झाली तर याबाबत बंगळुरू येथील राष्टÑीय मानसिक आरोग्य संस्था व इतर संस्थांकडून मिळून मार्गदर्शन देऊ.
लष्करातील दोघांना लागण
भारतीय लष्करातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यात कोलकाता येथील कर्नल डॉक्टर व डेहराडून येथील जेसीओ आहे. श्रीनगर येथे एका जवानाला लागण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचेही सूत्रांनी सांगितले.