ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १४ - पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने ताब्यात घेतलेला जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझरतर्फे एक नवी ऑडिओ टेप जारी करण्यात आली असून ' भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी देण्यात आली आहे. पाक सरकारची ही कारवाई देशासाठी घातक ठरणारी आहे, तसेच माझे शत्रू फार काळ (माझ्या अटकेचा) आनंद साजरा करु शकणार नाहीत, अशी गरळही त्याने ओकली आहे. या व्हिडीओतील आवाज अझरचा आहे असा दावा 'जैश'ने केला असला तरी तो आवाज अझरचा नसून दुस-याच व्यक्तीचा असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारत व अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे पाकिस्तानने बुधवारी (१३ जानेवारी) मसूद अझर, त्याचा भाऊ अब्दुल रेहमान रौफसह आणखी जैश ए मोहम्मदच्या आणखी काही जणांना ताब्यात घेतले होते.
' माझी हत्या झाली तर ना शत्रू शोक करतील, ना मित्र. माझे लष्कर शत्रूला फारकाळ आनंद उपभोगू देणार देणार नाही तसेच माझी कमतरता देखील जाणवू देणार नाही. मी अल्लाचा आभारी आहे. माझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. माझे कुटुंब, माझ्या मुलांची अल्लाने काळजी घेतली आहे आणि यापुढेही घेईल' असे मसूदने म्हटले आहे.
दरम्यान या टेपमध्ये पाकिस्तान सरकारवर टीका करत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. 'भारतामुळे इथे खूप कल्लोळ माजला आहे. आम्हाला अटक करा, मारा, अटक करा, मारा, अशी आरडाओरड भारताकडून करण्यात येत आहे. आणि आमच्यामुळे भारताशी असलेल्या मैत्री-संबंधांवर परिणाम होईल या भीतीने देशाचे शासक चिंतेत आहेत. कारण आयुष्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना मोदी आणि वाजपेयी यांचे मित्र म्हणून मिरवायचे आहे' अशी टीका अझरने केली आहे. 'पण यामुळे पाकिस्तान सरकार शांततेकडे दुर्लक्ष करू शकत नाही, सरकारने मुस्लिम राष्ट्र व जिहादच्या बाजूने उभं रहायला हव', असंही अझरने म्हटलं आहे.