लखनऊ - पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेला वाद शमण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून पद्मावती चित्रपट रिलीज होऊ न देण्याची विनंती केली आहे. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुका लक्षात घेता चित्रपटाला रिलीज होऊ न देणं कायदा - सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिताचं असेल असं उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे. राज्य सरकारच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांना पत्र लिहिलं आहे. चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.
अनेक संघटनांनी चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध केला असून चित्रपटगृहांमध्ये तोडफोड करण्याची धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयाला विनंती आहे की, त्यांनी यासंबंधी सेन्सॉर बोर्डाला सांगावं. जेणेकरुन चित्रपटाला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे सदस्य जनतेच्या भावना लक्षात ठेवून निर्णय घेतली असं उत्तर प्रदेश सरकारने पत्रात लिहिलं आहे.
1 डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल. राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'पद्मावती' चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर मौन सोडत कोणीही हा चित्रपट रिलीज होण्यापासून रोखू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. एक महिला म्हणून या चित्रपटाचा भाग असणं, आणि ही कथा लोकांसमोर मांडण्यात मला गर्व वाचत आहे. जो सांगण्याची गरज नाही असं दीपिका पादुकोन बोलली आहे.